मटणाचा तांबडा रस्सा

सोलापूरच्या सौ. शालिनी चितारी काकूंच्या डब्यातला अजून एक चविष्ट पदार्थ म्हणजे, 'मटणाचा तांबडा रस्सा'!

गेली कमीतकमी पन्नास वर्षे, अनेक रविवारी, आम्ही काकूंच्या हातच्या मटण चॉप्स आणि मटणाचा रस्सा असलेल्या डब्याचा आस्वाद घेत आहोत. मुरलीधर चितारी काका, दुपारी एक-दीडच्या सुमारास आम्हाला चार पुडी डबा आणून द्यायचे. आषाढातल्या रविवारी तर आमच्यासाठी खास डबा घेऊन यायचेच.  त्या डब्याला दृष्ट लागू नये म्हणून नेहमीच त्यात  कोळशाच्या एक तुकडा ठेवलेला असायचा. खरोखरच दृष्ट लागण्यासारखे लाजबाब पदार्थ त्यात असायचे. एका डब्यात मटण चॉप्स, एका डब्यात 'मटणाचा तांबडा रस्सा' आणि दोन डब्यांत त्याच्याकडचा खास मसाल्याचा हलका वास असलेला मऊ, मोकळा भात! 

आता काकूंचे वय झाले असले तरीही अजूनही त्या उत्साही आहेत. काकूंची सून सौ राजेश्री चितारी, त्यांचा वारसा चालवत आहे. राजेश्रीनेच मला काकूंच्या मटण ग्रीन चॉप्सची आणि मटणाच्या तांबडा रस्स्याची कृती लिहून पाठवली आहे. 

तुम्हीही या पदार्थाचा आस्वाद घ्या.  

साहित्य :-
१. मटण :- १ किलो 

२. कांदे:- ६ ते ७

३. सुके खोबरे कीस :- १ वाटी 

४. लसूण पाकळ्या:- २०

५.  आले;- ३ इंचाचा तुकडा 

६. कोथिंबीर:- पाव वाटी 

७. काजू-बदाम पेस्ट:- ६-७ काजू आणि बदामाची पेस्ट 

८. गरम मसाला :- धने-५० ग्राम, दालचिनी-७ ते ८ तुकडे, लवंग-४, मिरी-८-१०,  सुक्या लाल मिरच्या -७ ते ८ . 

९. तेल:- तीन मोठे डाव 

१०. मीठ चवीनुसार 

११. लाल तिखट:- तीन चमचे 

कृती :-

कांदे चिरून घेऊन थोड्या तेलात परतून घ्यावेत. खोबरे कोरडे परतून घ्यावे. कांदे आणि खोबरे एकत्रित वाटून घ्यावे. 

प्रेशर पॅनमध्ये तीन डाव तेल घालून त्यामध्ये खोबरे-कांदा वाटण, आले-लसूण वाटण चांगले परतून घ्यावे. त्यात मटणाचे तुकडे घालून परतून घ्यावे. त्यात काजू-बदाम पूड, तीन चमचे लाल तिखट, पाव चमचा हळद, तीन चमचे गरम मसाला घालून ढवळून घ्यावे. त्यामध्ये ३ फुलपात्र पाणी घालून चवीपुरते मीठ घालावे. प्रेशर कुकरचे झाकण बंद करून चार -पाच शिट्ट्या करून मटण शिजवून घ्यावे. . 









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पनीर-मटार बेक्ड करंजी

खंबायती हलवासन

नाचणीची बिस्किटे