मटण ग्रीन चॉप्स

आजपर्यंत मी खाल्लेल्या मटण चॉप्स पैकी सगळ्यात उत्तम चॉप्स हे सोलापूरच्या सौ शालिनी चितारी काकूंच्या हातचे आहेत. काकूंचे सगळेच खाद्यपदार्थ उत्तम होतात. पण मटण चॉप्स आणि मटणाचा तांबडा रस्सा त्या विशेष चांगला करतात.  

काकूंचे माहेर पुण्यातल्या कॅम्प भागात राहणाऱ्या नरलांकडचे. हे पदार्थ करायला त्या त्यांच्या आईकडून शिकल्या , असे काकू सांगतात.  गेली अनेक वर्षे काकू आम्हाला अगदी प्रेमाने हे पदार्थ खायला घालत आहेत. 

तुम्हीही काकूंच्या प्रमाणाने हे मटण चॉप्स करून बघा!



साहित्य :-

१. मटन चॉप्स:- १ किलो 

२. ओला नारळ:- १ मोठा 

३. कोथिंबीर:- अर्धा वाटी 

४. हिरव्या मिरच्या :-१० ते १२

५. आले :- ३ इंच 

६. लसूण पाकळ्या :-१५ ते २० . 

७. काजू बदाम पेस्ट:- सात-आठ काजू व बदामाची पेस्ट  

८ गरम मसाला :- मिरे -१०, लवंग-४, वेलदोडे-७ ते ८, दालचिनी तुकडे-७ ते ८ 

९. तेल:- तीन मोठे चमचे 

१०. मीठ:- चवीनुसार 

११. हळद:-पाव चमचा  


कृती :-

ओला नारळ, कोथिंबीर आणि हिरवी मिरची असे हिरवे वाटण करून घ्यावे. आले आणि लसूण एकत्र वाटून घ्यावे. काजू आणि बदामाचे वाटण करून घ्यावे. गरम मसाल्याची पूड करून घ्यावी. 

प्रथम चॉप्स स्वच्छ धुऊन घ्यावेत. प्रेशर पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवावे. तेल चांगले गरम झाल्यावर त्यात चॉप्स परतून घ्यावेत. त्यामध्ये आले- लसूण पेस्ट, हिरवे वाटण, हळद घालून चांगले परतून घ्यावे. त्यात गरम मसाला व चवीनुसार मीठ घालावे व पुन्हा चांगले परतून घ्यावे. त्यामध्ये काजू-बदामाची पेस्ट घालून चांगले मिसळून घ्यावी .

त्यानंतर प्रेशर पॅनमध्ये अडीच ग्लास पाणी घालून चार शिट्ट्या काढून घ्याव्यात.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चमचमीत चकली!

शेपूची फळं!

आमटीचा गोडा मसाला (ब्राह्मणी)