सोनेरी जवस, खसखस व लिंबाचा केक

पुणे महानगरपालिकेच्या सोनावणे हॉस्पिटलमधल्या, डॉक्टर अनिता भोसले,  या बालरोगततज्ज्ञ मैत्रिणीने मला त्यांच्या बागेतली, ताजी पिवळी धमक लिंबे दिली होती. त्या लिंबाच्या वासामुळे, मला  Lemon-Poppyseed  केक करायचा मोह झाला. 
आम्ही २०१६ साली बर्लिनला गेलो होते. त्यावेळी माझा मुलगा अनिरुद्ध तिथे एम. एस. करत होता. त्याच्याकडे एक मोठी बाटली भरून जांभळ्या रंगाची खसखस होती. मी जांभळी खसखस प्रथमच बघत होते. माझी मुलगी, असिलता, त्याच्याकडे  बर्लिनला आलेली असताना, त्या दोघांनी Lemon-poppy seed केक केला होता. त्यातली खसखस उरलेली होती. मीही लगेच तो केक करून बघितला. पिवळट रंगाच्या केकमध्ये जांभळ्या रंगाची खसखस फारच सुरेख दिसते. या केकची चवही विशेष चांगली लागते. पुढेही एक-दोन वेळा जर्मनीहून मी ती जांभळी खसखस मागवून घेतली आणि केक, मोदक तसेच इतर पदार्थांत वापरली. 

त्याच केकचा, मैद्याऐवजी कणीक वापरून जरासा वेगळा प्रकार मी करून बघितला. सध्या माझ्याकडे ती जांभळी खसखस नाही. त्यामुळे आपली नेहमीचीच पांढरी खसखस मी वापरलीय. पण माझ्या मुलीने अमेरिकेहून आणलेले सोनेरी रंगाचे जवस माझ्याकडे होते. केकमध्ये पिवळा रंग घालायच्या ऐवजी हे जवस वापरावेत असे मी ठरवले. मी पिवळा रंग आणि लिंबाचा इसेन्स वापरला नाही. आपल्याकडे मिळणाऱ्या तपकिरी रंगाच्या जवसापेक्षा हे सोनेरी जवस आकाराने थोडे छोटे असतात. तसेच त्याची चवही जरा सौम्य असते. पण तपकिरी जवस, आरोग्याच्या दृष्टीने जास्त गुणकारी असतात. 

साहित्य:-
लिंबू:- १, मोठे, ताजे व पिवळे धमक असावे
अंडी:-३
कणीक:- १५० ग्रॅम (२ वाट्या, सपाट. पीठ न दाबता घेणे) 
लोणी:-१५० ग्रॅम ( १ वाटी) 
साखर:- १७५ ग्रॅम्स (सव्वा वाटी) 
खसखस:- २ ते ३ चमचे (आवडत असल्यास जास्त घालावी)
सोनेरी जवस:- २ ते ३ चमचे (आवडत असल्यास जास्त घालावी)
लिंबाचा इसेन्स :-ऐच्छिक १ चमचा
पिवळा रंग:- ऐच्छिक, पाव चमचा
बेकिंग पावडर:- ३/४ चमचा
खाण्याचा सोडा;- १/४ चमचा  
मीठ- चिमूटभर 

कृती:-
कुकरचा अल्युमिनियमचा डबा घ्यावा . त्या डब्याला आतून सगळीकडून तूप लावून घ्यावा व त्यावर आतून कणिक भुरभूरवून घ्यावी.  
कुकरची शिट्टी काढून, कुकरच्या तळात जाळी ठेऊन, कुकर गॅस वर तापायला ठेवावा.  
कणिक, खसखस , सोनेरी जवस, मीठ व बेकिंग पावडर एकत्र करावे. 
लिंबाची साल बारीक किसणीने किसून घ्यावी. लिंबाचा रस काढून घ्यावा.   
अंडी, साखर, लोणी,  लिंबाचा रस आणि किसलेली लिंबाची साल एकत्र करून हलके फेटून घ्यावे. लिंबाचा इसेन्स आणि पिवळा रंग घालायचा असेल तर त्या दोन्हीही गोष्टी या मिसरणात घालाव्यात.   
कोरडे पदार्थ हळू-हळू ,अंडी साखर व लोण्याच्या मिश्रणांत मिसळावे . 
अगदी पाच-दहा मिनिटांत तयार झालेले हे केकचे कच्चे मिश्रण, आतून पीठ भुरभुरवून ठेऊन तयार करून ठेवलेल्या कुकरच्या डब्यात ओतवे . 
तो डबा कुकरमध्ये ठेऊन,  कुकरच्या झाकणावर शिट्टी ठेऊन, झाकण बंद करून, केक मंद आचेवर ४५-५० मिनिटे केक भाजावा. ओव्हनमध्येही  भाजता येईल.  






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पनीर-मटार बेक्ड करंजी

खंबायती हलवासन

नाचणीची बिस्किटे