कुडाळ देशकर पद्धतीची माशाची आमटी
माझ्या आठवणीत, मासळीचा सगळ्यात चवदार रस्सा, १९८६ सालच्या डिसेंबर महिन्यांतली आहे. आमच्या लग्नानंतर ,मी आणि आनंद गोव्याला गेलो होतो. आनंदचे धाकटे मामा, बाबूमामा जोशी त्यावेळी गोव्यात राहत होते. बाबूमामांची बायको, म्हणजे आमच्या अलका मामी, माहेरच्या तेंडुलकर, म्हणजे कुडाळ देशकर आद्य गौड सारस्वत ब्राम्हण आहेत. मामींनी आम्हाला त्यांच्या माहेरच्या पद्धतीची माशाची आमटी खायला घातली होती. त्याची चव मी कधीही विसरणार नाही. अलका मामींना विचारून त्यांची ती पाककृती आज माझ्या ब्लॉगवर टाकते आहे.
साहित्य:-
मासे:- बांगडा, पापलेट, सारंग, इसवण, यापैकी एखाद्या प्रकारच्या माशाचे पाच-सहा माध्यम आकाराचे तुकडे
मीठ- चवीनुसार
१ मोठ्ठ्या ओल्या नारळाचे खवलेले खोबरे (दोन वाट्या भरून खोबरे)
चिंच कोळासाठी- दोन चमचे कोळ
धने-एक ते दीड चमचा
१ कांदा- बारीक चिरून
लाल तिखट- १ चमचा भरून
मिरे;- ५ ते ६
लाल तिखट
हळद- अर्धा चमचा
तांदुळाची पिठी- अर्धा चमचा
साजूक तूप/खोबऱ्याचे तेल- एक चमचा
मीठ- चवीनुसार
१ मोठ्ठ्या ओल्या नारळाचे खवलेले खोबरे (दोन वाट्या भरून खोबरे)
चिंच कोळासाठी- दोन चमचे कोळ
धने-एक ते दीड चमचा
१ कांदा- बारीक चिरून
लाल तिखट- १ चमचा भरून
मिरे;- ५ ते ६
लाल तिखट
हळद- अर्धा चमचा
तांदुळाची पिठी- अर्धा चमचा
साजूक तूप/खोबऱ्याचे तेल- एक चमचा
कृती:-
माशाच्या तुकड्यांना, चमचाभर मीठ लावून ठेवावे.
१५-२० मिनिटानंतर ते तुकडे एक दोन वेळा, स्वच्छ पाण्यात धुवून घ्यावेत. यामुळे माशांचा उग्र वास व ओशटपणा कमी होतो.
अर्धा वाटी खोबरे, एक चमचा बारीक चिरलेला कांदा व ५-६ मिरे घालून अगदी गंधाप्रमाणे बारीक वाटून घ्यावे व त्यात अर्धा चमचा तांदळाचे पीठ मिसळून घ्यावी.
दोन वाट्या खोबऱ्यात अर्धा वाटी पाणी घालून दाट रस काढून ठेवावा. त्यात वरील खोबऱ्याचे वाटण मिसळून ठेवावे.
दोन चमचे चिंचेचा कोळ, एक ते दीड चमचा धणे, १ चमचा गच्चं भरून लाल तिखट, अर्धा चमचा हळदपूड व अर्धा चमचा मीठ एकत्र करून अगदी बारीक वाटून घट्टसर गोळी करून ठेवावी.
उरलेल्या अर्ध्या वाटी खोबऱ्यात, दीड वाटी पाणी घालून रस काढून घ्यावा. हा रस फार पातळ करू नये. आमटी पांचट होते त्यात वरील खोबरे, लाल तिखट व चिंचकोळाची वाटलेली गोळी मिसळून चवीनुसार मीठ घालावे.
कढईत एक चमचा साजूक तूप अथवा कोकणातल्या पद्धतीनुसार खोबरेल तेल घालावे.
तूप/ खोबरेल तेल गरम झाल्यावर अगदी बारीक चिरलेला एक चमचा कांदा घालून मंद गॅसवर खमंग परतावा.
त्यानंतर त्यात, खोबरे, तिखट, चिंचकोळ इ. मिसळलेला पातळ रस घालून ऊक॓ळी काढून घ्यावी.
हा पातळ रस उकळायला लागला की त्यात माशांचे तुकडे घालावेत. एक मिनिटभर उकळू दिल्यानंतर त्यात, कांदा -खोबरे-तांदुळाची पिठी घातलेला, दाट रस घालावा. हे सगळी आमटी एकत्रित दोन-तीन मिनिटेच उकळू द्यावी. मासे लगेचच शिजतात. त्यामुळे ही आमटी थोडा वेळच उकळावी, फार उकळू नये.
ऐच्छिक:-आवडत असल्यास, शेवटी उकळी फोडताना रस्स्यात चार-पाच तिरफळे जराशी ठेचून घालावीत.
मासे न खाणाऱ्यांसाठी याच पध्दतीने गोळ्यांची आमटी करावी. माशांऐवजी बेसन पीठाचे गोळे करून घालावे. गोळे बनविण्यासाठी:-
पाऊण वाटी बेसन पिठात दोन चमचे चिरलेला कांदा -चवीनुसार तिखट पूड व मीठ आणि बारीक चिरून थोडी कोथिंबीर घालावी. पाणी घालून भज्यांच्या पीठापेक्षा जरा घट्टसर पीठ भिजवावे. बाकी सर्व कृती वरीलप्रमाणेच फक्त पातळ रस उकळू लागल्या वर त्यात लहान रायआवळ्याच्या आकाराचे बेसनपीठाचे गोळे करुन सोडावेत. गोळे शिजायला मासे शिजायला लागतो त्यापेक्षा जरा जास्त वेळ लागतो. गोळे शिजले की ते आमटीत वर तरंगू लागतात. त्यानंतर त्यात, खोबऱ्याचे वाटण घातलेला दाट रस घालावा व एक उकळी काढावी. या प्रकारच्या गोळ्याच्या आमटीत त तिरफळ घालत नाहीत.
मस्त एकदम
उत्तर द्याहटवागोड्या पाण्यातील मासे घालुन अशी आमटी जमेल का, करायला सांगतो घरी
उत्तर द्याहटवा