खंबायती हलवासन

माझी मोठी मावशी,  सौ उषा मावशी बडोद्याला राहायची.  आमच्या लहानपणी , ती सोलापूरला येताना आमच्यासाठी खास खाऊ म्हणून खंबायतचे हलवसन आणायची. आम्हला ते फारच आवडायचे. ही मिठाई खूपच खमंग लागते आणि करायला अगदीच सोपी असते. 

साहित्य:-

१. म्हशीचे साय न काढलेले दूध:- अर्धा लिटर
२. साजूक तूप:- तीन-चार चमचे
३. बारीक केलेला डिंक:- २ चमचे
४. भरड कणीक:- २ चमचे
५.दही:- एक चमचा
६. साखर:- अर्धा ते पाऊण वाटी
७. जायफळ आणि वेलदोडापूड:-चमचाभर
८. बदाम-पिस्ता काप

कृती:-

डिंकाचे मोठे खडे बारीक करून घ्यावेत. पण अगदी बारीक पूड करू नये. एका कढईत दोन चमचे तूप गरम करावे. त्यात चमचाभर डिंक फुलवून घ्यावा. डिंक तळून बाजूला काढून ठेवावा. 

त्यानंतर त्याच पॅनमधे अजून चमचाभर तूप घालून त्यात चमचाभर कणीक लालसर भाजून घ्यावी. कणिक जाडसर असल्यास उत्तम. नसल्यास एक चमचा कणिक आणि एक चमचा रवाही घेता येतो.

कणीक भाजून झाल्यावर, त्याच कढईत दूध घालून उकळायला ठेवावे. त्यात फुलवलेला डिंक व एक चमचा दही घालावे. हे मिश्रण सतत हालवत ठेवावे.

दुसऱ्या एका पॅनखाली गॅस लावून साखर गरम करायला ठेवावी. थोड्या वेळात त्याचे कॅरॅमेल होते. ते कॅरॅमेल, दुधाच्या उकळत असलेल्या मिश्रणात घालावे.

दुधाचे मिश्रण साधारण १५-२० मिनिटांत आळून येते व कढई पासून सुटायला लागेलं. त्यानंतर गॅस बंद करून तो गोळा

गार करायला ठेवावे. वळण्यापूर्वी  त्यात जायफळ-वेलदोड्याची पूड घालावी.

मिश्रण बऱ्यापैकी थंड झाल्यावर त्याचे समान आकाराचे गोळे करावेत. तळहातावर एकेक गोळा दाबून, सजावटीसाठी त्यावर बदाम पिस्त्याचे काप लावावेत.

उपवासाला चालेल असे हलवासन करायचे असेल तर कणकेच्या ऐवजी राजगिऱ्याच्या लाह्या वापराव्यात. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पनीर-मटार बेक्ड करंजी

नाचणीची बिस्किटे