घेवर

आम्ही नुकतेच जयपूरला लग्नासाठी गेलो होतो. तिथले घेवर प्रसिद्ध असल्याने तिथे घेवर खायची इच्छा होती.पण तिथे होळीनंतर १५ दिवसांनी साजरा होत असलेल्या, आपल्या चित्रगौरीसारखाच 'गणगौर' या सणाच्या निमित्ताने घेवर बनणे सुरू करतात, असे कळले.त्यामुळे जयपूरमधे कुठेही ताजे घेवर मिळाले नाहीत. म्हणून आज घरीच, शुद्ध तुपातले घेवर केले!


साहित्य

१ तूप :- पाव वाटी (मोहन) 

२. दूध:- अर्धा वाटी

३. मैदा :- एक वाटी

४. लिंबाचा रस:- अर्धा चमचा

५. बर्फाचे पाच-सहा खडे

६. तूप:- तळणीसाठी

७.साखर एक वाटी. 

८.बदाम काप

कृती

१.मोहन म्हणून घेतलेले तूप आणि बर्फाचे खडे मिक्सरमधे घालून फिरवावेत . 

२. तूप खूप फेटले गेल्यावर पांढरे होते. मग त्यामध्ये  दूध आणि लिंबाचा रस घालावा आणि पुन्हा मिक्सरमध्ये फिरवावे. 

३ . त्यानंतर मैदा व गर पाणी (अंदाजे एक कप) घालून पातळसर पीठ करून घ्यावे घेतले. 

४. कढईत तळणीसाठी तूप चांगले तापवावे. त्यात पळीने थोडे थोडे करत वरील मिश्रण घालून घेवर तयार करून घ्यावेत. 

५. लालसर रंगावर घेवर तळून झाल्यावर , हलक्या हाताने घेवर बाहेर काढून घेऊन त्यातील तूप निथळायला ठेवावे. 

६. साखरेचा एकतारी पाक करून घेवरवर घालावा 

७. . घेवरावर बदाम-पिस्त्याचे काप घालून सजावट करावी . 

८. घेवर  पाकात न घालता वरून रबडी घालूनही खाता येतात.




माझी आई नेहमी साजूक तुपातले मस्त वर  करायची. जवळच्या नातेवाईकांपैकी कोणा मुलीचे लग्न ठरले की रुखवतासाठी आई घेवर करून द्यायची. घेवर करण्यासाठी तिच्या कडे वरचा घेर जास्त असलेला उभा गंज होता. विणकामाच्या सुईने ती घेवर तळणीतून बाहेर काढायची. आज तेही आठवले. 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पनीर-मटार बेक्ड करंजी

खंबायती हलवासन

नाचणीची बिस्किटे