गोळ्याचे सांबर

बेसनाच्या पिठाचे अनेक पदार्थ आपण घरी करतो. परवा सहज बोलता बोलता माझ्या वडिलांना गोळ्याच्या सांबाराची आठवण झाली.  त्यानंतर त्यांनी त्यांच्या लहानपणीची आठवण मला सांगितली.  त्यांच्या लहानपणी घरात स्वयंपाकाला गंगुबाई नावाच्या  बाई होत्या. वडील गंगुबाईंचे ते विशेष लाडके होते म्हणे. गंगुताईंनी किंवा माझ्या आजीने, म्हणजेच वडिलांच्या आईने  गोळ्याचे सांबर केले की त्या खास माझ्या वडिलांसाठी, सांबारात एकच गोळा आकाराने मोठा करायच्या आणि वडिलांना अगदी प्रेमाने तो वाढायच्या. लहानपणी इतक्या छोट्या गोष्टीचेही किती अप्रूप असते नाही? वडिलांनी आज त्यांच्या वयाच्या सात्त्यांशीव्या वर्षी सुद्धा ती खास आठवण मनांत कुठेतरी जपून ठेवलेली आहे. 

बरेच दिवसांत मी गोळ्याचे सांबर केले नव्हतेच. डिलांनी आठवण करून दिली म्हणून मीही गोळ्याचे सांबर करायचे ठरवले. माझ्या आजीने सांगितलेली आणि मी उतरवून घेतलेली ही  पाककृती आज लिहून काढली.
साहित्य:- 
गोळ्यांसाठी-
चण्याच्या डाळीचा भरडा -१ वाटी  
चण्याच्या डाळीचे पीठ- १/२ वाटी  
मीठ- अंदाजाने, चवीपुरते 
हिंग- अंदाजाने, चिमूटभर 
हळद- अंदाजाने, चिमूटभर 
तिखट - अंदाजाने, चिमूटभर 
जिऱ्याची पूड - अंदाजाने, चिमूटभर 
हिरवी मिरची- १-२, तिखटपणा हवा असेल त्या मानाने कमी-जास्त 
कोथिंबीर- अंदाजे पाव वाटी 
तेल-दोन चमचे 
सांबरासाठी-
तेल-३ चमचे  
जिरे-दोन चमचे  
मोहरी-अर्धा चमचे 
हळद-पाव चमचा 
हिंग- चिमूटभर   
चिंचचा कोळ-अंदाजे दोन चमचे  
गूळ-अंदाजे एक चमचा  
मीठ-चवीनुसार  
कच्चा मसाला- अर्धा चमचा 
सुके खोबरे- छोटा तुकडा  
कोथिंबीर- चिमूटभर  
कृती:-

भरडा व डाळीचे पीठ एकत्र करावे. त्यात चवीपुरते मीठ, हिंग, हळद, तिखट, जिऱ्याची पूड, कोथिंबीर व हिरव्या मिरचीचे वाटण आणि दोन चमचे तेल घालून, हे पीठ तासभर सैलसर भिजवून ठेवावे.

सुक्या खोबऱ्याचा तुकडा आगीत छानपैकी काळपट होईल असा खरपूस भाजून घ्यावा. पूर्वी चुलीत भाजायचे. पण घरात चूल नसल्याने मी गॅस वरच भाजून घेते. एक-दीड चमचा जिरे हलकेसे भाजून घ्यावे व जिरे आणि भाजलेले खोबरे कुटून पूड करावी.   

काढीत किंवा जाड बुडाच्या पातेल्यात, फोडणी करण्यासाठी तेलात पाव चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, मोहरी ततडल्यावर हिंग, हळद घालावी. त्यामध्ये तीन-चार वाट्या पाणी घालावे. त्यात चिंचेचा कोळ, गूळ, मीठ व कच्चा मसाला, कोथींबीर  घालून ते सांबर चांगले उकळू द्यावे. बिजवून ठेवलेल्या डाळीच्या पिठाचे वभरड्याचे छोटे छोटे गोळे करून सांबारात सोडावेत. गोळे सोडल्यानंतर,  सांबर दहा-बारा मिनिटे चांगले उकळू द्यावे. म्हणजे गोळे आतपर्यंत चांगले शिजतात.  

दाटपणा येण्यासाठी थोडे डाळीचे पीठ पाण्यात कालवून शेवटी सांबाराला लावावे व थोडा वेळ सांबार उकळू द्यावे. . 

माझ्याकडे चण्याच्या डाळीचा भरडा नसतो. त्यामुळे मी डाळ तासभर भिजत घालून, मिक्सरमधें वाटून, त्यात इतर साहित्य घालून त्यापासून गोळे करते.

माझ्या आईला सगळ्या गोष्टी चमचमीत लागायच्या. त्यामुळे आई बरेचदा गोळ्याच्या सांबारातले गोळे, तळून मग सांबारात सोडायची. ते सांबर आणि त्यातले ते गोळे अप्रतिम लागतात.  
  


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चमचमीत चकली!

शेपूची फळं!

आमटीचा गोडा मसाला (ब्राह्मणी)