कणीक-बदामपुडीचा केक!

माझे अमेरिकास्थित भाऊ-वहिनी, दरवेळेस येताना माझ्या आई-वडिलांसाठी तिकडे मिळणारे आमंड मील (सालं काढलेल्या बदामाची रवाळ पूड) घेऊन येतात.सध्या ते वापरून मी वेगवेगळे पदार्थ त करून बघते आहे. परवा सकाळी सकाळी साय घुसळून लोणी काढले. ते बघून मला केक करायची हुक्की आली. पण घरात मैदा-रवा काहीच नव्हते.म्हणून कणिक आणि आमंड मील वापरून केक केला. हा केक माझ्या अंदाजाने प्रमाण घेऊन केला. तो खूपच चांगला झाला म्हणून सहज माझ्या मुलीला, असिलताला व्हिडीओ कॉल वर दाखवला. या केकला whole wheat-almond pound cake म्हणतात असे तिने मला सांगितले. त्यांनतर इंटरनेटवरच्या पाककृती बघितल्या. तिथे अनेक वेगवेगळ्या रेसिपीज आहेत. 

मला अगदी रोजचा स्वयंपाक करतानाही सगळेच पदार्थ वजन करून घ्यायची सवय आहे. एकप्रकारचा चाळाच आहे म्हणा ना! त्यामुळे नेमकी पाककृती मला देता येतेय.  


साहित्य :-
४ अंडी
२०० ग्रॅम घरचे पांढरे लोणी
२०० ग्रॅम साखर
१५० ग्रॅम कणीक
७५ ग्रॅम आमंड मील (बदामाची रवाळ पूड) 
चिमुटभर मीठ
१ चमचा केशर इसेन्स
१ चमचा बेकिंग पावडर 

कृती:-
कुकरच्या डब्याला तूप लावून घेतले व त्याला आतून कणिक भुरभूरवून घेतली. 
कुकरची शिट्टी काढून, पण कुकरच्या तळात जाळी ठेऊन, कुकर गॅस वर तापायला ठेवला. 
कणिक, बदामाची पूड , मीठ व बेकिंग पावडर एकत्र केले.  
अंडी, साखर, लोणी व इसेन्स एकत्र करून हलके फेटून घेतले. 
कोरडे पदार्थ हळू-हळू ,अंडी साखर व लोण्याच्या मिश्रणांत मिसळले. 
अगदी पाच-दहा मिनिटांत तयार झालेले हे केकचे कच्चे मिश्रण, तयार करून ठेवलेल्या कुकरच्या डब्यात ओतले. 
तो डबा कुकरमध्ये ठेऊन,  कुकरचे झाकण बंद करून केक मंद आचेवर ४५-५० मिनिटे केक भाजला!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चमचमीत चकली!

शेपूची फळं!

आमटीचा गोडा मसाला (ब्राह्मणी)