आमटीचा गोडा मसाला (ब्राह्मणी)


काल खादाड खाऊ ग्रूपवर श्री. गिरीश कोळींनी नरसोबाच्या वाडीला गुरूजींच्या घरी ब्राह्मणी पद्धतीने केलेल्या आमटीचे
वर्णन केले . त्या आमटीची चव त्यांना आवडल्यामुळे, ती कशी करायची, असा प्रश्न त्यांनी विचारला होता.
ब्राह्मणी घरांमध्ये केलेल्या आमटीत, गोडा मसालाही ब्राह्मणी पद्धतीचच हवा. त्या शिवाय आमटीला ती खास ब्राह्मणी चव
येणारच नाही.
हा गोडा मसाला कसा करायचा? असे श्यामला सुटोणेंनी विचारले. म्हणून मुद्दाम माझ्या आई-आजी कडून लिहून घेतलेले
मसाल्याचे साहित्य आणि कृती देतेय. आई-आजी प्रमाण सांगताना मूठभर, पाव भांडे, बोटभर, चिमूटभर, दोन तुकडे असे
प्रमाण सांगायच्या. मी माझ्या अंदाजाने काही वजने दिली आहेत.
थोड्याफार फरकाने असा मसाला सगळ्या ब्राम्हणी घरांमध्ये करतात.
 साहित्य 
सुके खोबरे:- एक मोठी वाटी (१००-१२५ ग्रॅम) 
तीळ:- पाणी प्यायचे फुलपात्र भरून (१००-१२५ ग्रॅम) 
हिरवे धने:- कुकरचा मोठा डबाभर (पाव किलो)
जिरे:-अर्धे पाणी प्यायचे फुलपात्र (१०० ते १२५ ग्रॅम)
हळकुंड:-बोटाच्या पेरा ईतके १-२ तुकडे
तमालपत्र:- १२-१५ पाने (५-७ ग्रॅम)
दगडफूल:- अंदाजे १ वाटीभर/अर्धे फुलपात्र भर/दीड मूठ (८-१० ग्रॅम) 
लवंगा:- २०-३० (८-१० ग्रॅम)
काळे मिरे:- १५-२० (५-७ ग्रॅम) 
दालचिनी:- १५-२० छोटे तुकडे (५-७ ग्रॅम) 
हिरवी वेलची:- १२-१५ (५-७ ग्रॅम) 
खडा हिंग:- साधारण छोट्या लिंबाएव्हडा खडा (१०-१२ ग्रॅम) 
लाल मिरच्या:- १०-१५  (५-७ ग्रॅम) 
नागकेशर:- १०-१२ काड्या 
मसाला वेलची:- २-३
शहाजिरे:- दोन चहाचे चमच
दोन:- डाव मीठ. 
कृती 
तीळ, जिरे, शहाजिरे मंद आचेवर कोरडे भाजून वेगळे ठेवावे.
सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करून घ्यावेत.
कढईत किंचित तेल घालून त्यावर हे काप गुलाबी रंगावर तळून घ्यावेत.
त्याचे बारीक कूट करून घ्यावे.
कढईत किंचित तेल तापवून त्यात धने भाजायला सुरू करावे.
धने अर्धवट भाजून होत आले की त्यात लाल मिरच्या घालून ते दोन्ही एकत्र भाजून घ्यावे.
हळकुंडाचे बारीक तुकडे करून ते थोड्या तेलात तळून घ्यावेत.
तमालपत्र, दालचिनी, नागकेशर, दगडफूल, लवंगा, मिरे, वेलदोडे हे कोरडे/अगदी थोड्या तेलावर, मंद आचेवर वेगवेगळे
परतून घ्यावे.
तेल तापवून त्यात हिंग तळून घ्यावे. हे सर्व पदार्थ वेगवेगळे बारीक कुटून घ्यावेत.
कुटलेले सगळे पदार्थ एकत्र करून त्यात मीठ घालून नंतर चाळून घ्यावेत.
तयार मसाला घट्ट झाकणाच्या डब्यात अथवा फिरकीचे झाकण असलेल्या काचेच्या वा चिनी मातीच्या बरणीत भरून ठेवावा. 




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पनीर-मटार बेक्ड करंजी

खंबायती हलवासन

नाचणीची बिस्किटे