साटोऱ्या

फेसबुकवरच्या आमच्या  'खादाड खाऊ' ग्रुपचे सदस्य राजीव कुलकर्णीं यांनी नुकतीच एक हळहळ ग्रूपवर व्यक्त केली. कुणीतरी ऑफर केलेल्या साटोरीला 'नको' म्हणण्याची चूक त्यांच्याकडून घडली! काहींनी त्यांच्या दुःखावर फुंकर घातली तर काहींनी त्यांच्या जखमेवर मीठ चोळले.एकुणात काय  ग्रुपवर साटोरीवरच चर्चा सुरू झाली. मग ग्रुपवरील तनया जी एम ने मला सटोरीची पाककृती देण्याचा लाडिक आग्रह केला. म्हणून माझी पाककृतींची वही उघडून माझ्या आईने शिकवलेली साटोरीची कृती लिहून काढली.

सारण:-

खवा पाव किलो. (२५० ग्रॅम),
बारीक रवा पाव वाटी (चार टेबलस्पून) तुपावर तांबूस भाजून घ्यावा. रवा गरम असतानाच दुधाचा हबका मारून घ्यावा. हा रवा आणि खवा मिसळून घ्यावा. खव्याच्या इतकीच पिठीसाखर त्यात मिसळावी. यामध्ये भाजलेल्या खसखसीची पूड साधारण पाव वाटी व स्वादासाठी वेलची पूड अथवा जायफळ पूड घालावी.

पारी:-

आध पाव (१२५ ग्रॅम ) बारीक रवा व  तीन पाव (७५० ग्रॅम ) मैदा एकत्र करावे. त्यात दोन टेबलस्पून साजूक तुपाचे मोहन गरम करून घालावे. चवीपुरते मीठ घालावे. हा रवा-मैदा दुधात( आई बरेचदा निरसे दूध घ्यायची) घट्ट भिजवून ठेवावा. भिजवलेला रवा-मैदा चांगला कुटून घ्यावा.

कृती:-

भिजवलेल्या रव्या-मैद्याच्या गोळ्यात खव्याचे सारण भरून साटोरी जाडसर लाटून घ्यावी. तव्यावर भाजून घ्यावी. थंड झाल्यावर साजूक तुपात गुलाबी रंगावर तळून घ्यावी. आई बरेचदा खोलगट तव्यावर साटोरी ठेऊन, बाजूने तूप सोडून तळून घ्यायची.  खरेतर तिला कढईत भरपूर तूप घालून साटोऱ्या  खरपूस तळायलाच  आवडायचे. 

माझी आई मोठया फुलक्याच्या आकाराची साटोरी करायची . आई म्हणायची, साटोरीची पारी बाहेरून कडक पण  खाताना खुसखुशीत असायला हवी. सटोरीत सारण भरपूर आणि कडेपर्यन्त भरलेले हवे. सारण भरपूर गोड  हवे . खसखशीची पूड जाडसर असावी व दाताखाली लागायला हवी. साटोरी तळताना टम्म फुगायला हवी आणि खाताना वरून भरपूर साजूक तूप घालूनच खायला हवी.

साटोरी हा आमच्या खान्देशातील खास पदार्थ आहे असे आई मोठ्या अभिमानाने सांगायची आणि माहेरच्या आठवणीने खूष व्हायची.   

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पनीर-मटार बेक्ड करंजी

खंबायती हलवासन

नाचणीची बिस्किटे